खासदार नारायण राणेंना ‘कोरोना’ची लागण, दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत ही माहिती दिली. कोरोनाची लागण झालेले राणे कुटूंबातील हे दुसरे सदस्य ठरले.

“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागिरकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी” असे आवाहन नारायण राणे यांनी केले आहे. तसेच लवकरच लोकसेवेत रुजू होईन, असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

तथापि, यापूर्वी नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना १६ ऑगस्ट रोजी कोरोनाची बाधा झाली होती. मुंबईतच ते अलगीकरणात राहिले होते. राज्यातील नेत्यांना, मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेकांनी यावर उपचारानंतर मात केली आहे.

राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला

महाराष्ट्रात बुधवारी १८ हजार ३१७ कोरोना संसर्गित रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात १९ हजार १६३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. आतापर्यंत एकूण १० लाख ८८ हजार ३२२ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.६१ टक्के झालं आहे. तर सध्या २ लाख ५९ हजार ०३३ सक्रिय (उपचार सुरु असलेले) रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ३६ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा झाला आहे.