भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले – ‘सचिन वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुली करण्याचे टार्गेट दिले होतेे, असा सनसनाटी आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलेल्या पत्रात केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांनी गृहमंत्री देशमुख आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते असा खळबळनजक आरोप करत मुख्यमंत्री ठाकरेच वाझे यांचे गॉडफादर असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. वाझे गृहमंत्री देशमुखांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायचे. त्यांना खंडणी वसुलीची परवानगी ठाकरेंनीच दिली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असे टीकास्त्र राणेंनी सोडले आहे.

खासदारराणे म्हणाले की, परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. सिंग यांचे आरोप खोटे असल्याचे देशमुख आता सांगत आहेत. मग इतके दिवस ते काय करत होते? आयुक्तपदावर असताना परमबीर काय करत होते याची कल्पना देशमुखांना नव्हती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वाझेसारखा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करतो. मनसुख हिरेन यांची दिवसाढवळ्या हत्या करतो आणि असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असतो. मुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात. तो मुख्यमंत्र्यांना अगदी संत सज्जन वाटतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ कमविण्यासाठीच सत्तेत आले आहे. यांच्या चौकशा झाल्या तर उत्तर देतांना यांना आयुष्य कमी पडेल असा घणाघात राणेंनी केला आहे.