नारायण राणेंनी केला मुख्यमंत्री ठाकरेंना फोन, अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंब यांच्यामध्ये सतत टीका-टिपणी होताना पाहायला मिळते. तर मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यातील वाद हा कमी होताना दिसत नाही तर तो वाढताना दिसतो आहे. राणे कुटुंब उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणेही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. तसेच सिंधुदुर्ग येथे मेडिकल कॉलेजचं ७ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आहे. त्यासाठी अमित शहा स्वत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. तर मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनानिमित्त नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या काही फाईल उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात पाठवल्या होत्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत फोनवर झालेल्या संवादाविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे म्हणाले की, परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यानंतर माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले बरं. आमच्यात तेवढाच संवाद झाल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

तसेच, दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शाह यांचा हा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता.परंतु, आता अमित शाह यांनी ६ फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.