‘मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही ‘घरगुती’, ‘बालिश’ अन् ‘भावनिक’ प्रश्नांच्या पलिकडं काहीच नसणारी’ : नारायण राणे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील दोन दिवसांपासून सामना या वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध करण्यात येत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्यांच्या या मुलाखतीवर आता भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत घरगुती असून बालिश, घरगुती आणि भावनिक प्रश्न यापलीकडे मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत दुसरे काहीच नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

नारायण राणे हे एक वृत्तवाहिनीवर बोलत होते तेव्हा ते म्हणाले की ही मुलाखत राज्याच्या विकासाची दिशा आणि दशा ठरविणारी नसून ही एक घरगुती पद्धतीनं घेतलेली मुलाखत आहे. सत्ता स्थापन करून २ महिने झाले असून अजून काही कामं केलेली नाहीत की काही महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले नाहीत. तसेच शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आलेले नाहीत. कर्जमाफीची फक्त घोषणा केली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला पदरी निराशाच पडली आहे असे ते म्हणाले. तसेच ते म्हटले की बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली, भाजपाने फसवलं एवढंच वाक्य ते सतत बोलत असतात असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

तसेच नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यावर अनुभव नाही असे म्हणून चालत नाही. २ महिने काम करून ३ दिवस सुट्टीवर जाणे हे पहिल्यांदाच ऐकत आहे असे देखील ते म्हणाले. तसेच मुलाखतीमध्ये राज्यात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत काहीच चर्चा झाली नसून जनतेच्या अडीअडचणी कशा दूर होतील आणि यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबतची चर्चा मुलाखतीत व्हायला पाहिजे होती असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेवर नारायण राणे जोरदार बरसले आणि म्हणाले जर मातोश्री मंत्रालय असेल तर सगळं कामकाज तेथेच शिफ्ट करा असा घणाघात देखील त्यांनी केला. तसेच नारायण राणे म्हणाले की हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. तसेच सीएएबाबत समर्थन करून भारतीय संविधानाने हा कायदा आणलेला आहे तो कोणत्याही धर्माचे समर्थन करत नाही त्यामुळे आधी कायदा काय आहे हे समजून घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिला.