Piyush Goyal : बोचऱ्या टीकेचा ‘सामना’ करणारे खासदार पियुष गोयल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   ठाकरे सरकारने निर्लज्ज राजकारण थांबवावे, अशी टीका करणारे खासदार पिषूष गोयल हे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पियूष गोयल यांना एक्सप्रेस गाड्यांवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी संजय राऊत आणि पियुष गोयल यांच्यामध्ये सोशल मीडियावर चांगलाच सामना रंगला होता. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील खासदार या नात्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर रेल्वे आणि वाणिज्य मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ते भाजपच्या वर्तुळात नेहमची चर्चेत असतात. पियूष गोयल हे केवळ मोदी आणि शाह याच्या विश्वासातीलच नाही तर चांगली कामगिरी करणाऱ्या केंद्रीय नेत्यांपैकी एक आहेत.

पियुष गोयल यांचे बालपण व शिक्षण

खासदार पियुष गोयल यांचा जन्म मुंबई येथील माटुंगामध्ये 19 जून 1954 मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माटुंगामध्ये झाले. माटुंगामधीली डॉन बॉस्को शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याचे आणि सिएचे शिक्षण घेतले. पियुष गोयल हे अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी सीएच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावला होता. तर विधी शाखेच्या परीक्षेत देखील ते मुंबईतून दुसरे आले होते. त्यानंतर त्यांनी येल, ऑक्सफर्ड आणि प्रिन्स्टन यासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले. त्यांचा विवाह सीमा गोयल यांच्याशी झाला असून त्यांना दोन आपत्ये आहेत.

संरक्षण समितीचे सल्लागार

पियूष गोयल यांनी काही काळ भारतातील मोठ्या बँकांच्या संचालक मंडळावर काम केले. तसेच केंद्र सरकारच्या वित्तियविषय आणि संरक्षण समितीचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. याशिवाय पियुष गोयल यांनी इंडियन मर्चंट चेंबर्सच्या व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

घरातूनच राजकारणाचा वारसा

पियूष गोयल यांना त्यांच्या घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांची आई चंद्रकला गोयल आणि वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या आई चंद्रकला गोयल या महाराष्ट्रातील विधानपरिषदेवर तीन वेळा निवडून गेल्या होत्या. तर वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते. त्यांना वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले असले तरी त्यांची प्रमुख जबाबदारी ही भाजपचे खजिनदार म्हणून होती.

त्यामुळे भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात पहिल्यापासून असल्याने पियूष गोयल यांचा भाजपमध्ये सहजरित्या प्रवेश झाला. त्यांच्या वडिलींनी भाजपच्या खजिनदार पदाची जबाबदारी दोन दशके सांभाळली. यानंतर ही जबाबदारी पियूष गोयल यांच्यावर पडली. खजिनदार म्हणून काम करत असताना तिजोरी भरलेली राहील हे पाहण्याचे काम त्यांनी व्यवस्थितपणे पाहिले.

मोदी सरकारमध्ये मंत्री

2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन करण्याऱ्या नेत्यांमध्ये पियूष गोयल यांचा समावेश होता. यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकाही नेत्याला संधी देण्यात आली नाही. मात्र गोयल यांच्या रुपाने पक्षाने त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. पक्षाने अगोदरच त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

रेल्वेमंत्री म्हणून उत्तम कामगिरी

पियूष गोयल हे 2010 मध्ये भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले होते. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये गोयल यांना कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला. डिसेंबर 2017 मध्ये सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रेल्वे खात्याचा पदभार देखील गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. यानंतर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अरुण जेठली यांच्या आजारपणात गोयल यांनी अर्थखात्याची देखील जबाबदारी सांभाळली. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय सोपवण्यात आले. तसेच त्यांनी वाणिज्य खात्याचा देखील अतिरिक्त पदभार सांभाळला.

गोयल यांनी महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का ?

पियूष गोयल यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांच्यावर पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आले. पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला होता.