भाजपाची मोठी घोषणा ! पक्षाचे खासदार देणार 1 कोटी, आमदार करणार 1 महिन्याचं वेतन दान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपने देखील आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन कोरोनासाठी देणार असल्याचे जाहीर केले.

देशात लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या निधीची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान आता भाजपचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन कोरोनासाठी देणार आहेत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज याची घोषणा केली आहे. भाजपचे सर्व आमदार एक कोटींचा स्थानिक निधी देखील यासाठी देणार आहेत, असेही जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना बाधितासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.