‘SK’ म्हणतात सेनेचे 45 आमदार आमच्या संपर्कात, ‘AS’ सांगतात भाजपाचे 50 MLA ‘टच’मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सत्ता स्थापनेबरोबरच मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय ठरलं आहे अथवा त्याचं पुढं काय होणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. भाजपाचे 105 आमदार असून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे तर महायुतीतील सेनेला 56 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भाजपाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी अतिशय खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 45 जण आमच्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे. संजय काकडेंनी केलेल्या दाव्यामुळं राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान, वेगवेगळया कारणांमुळे निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेतील तणाव वाढला असून त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे.

महायुतीकडून म्हणजेच भाजपा आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून देत सेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यामध्येच खा. संजय काकडेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काकडेंनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

दरम्यान, त्यांनी संपर्कात असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडा सांगितला आहे मात्र कोणाचं नाव घेतलेलं नाही. दुसरीकडं मराठवाड्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील असाच एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपाचे 50 आमदार आमच्या संपर्कात असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत आहेत असा दावा केला आहे. त्यामुळं खासदार संजय काकडे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या दाव्यांमध्ये नेमकं काय खरं हे आगामी 2-3 दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

सद्यस्थितीला शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर पत्रकारांना अनौपचारिकरित्या बोलताना मुख्यमंत्र्यांनी आगामी 5 वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असून पुढच्या आठवडयात शपथविधी अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पवित्रा असाच ठेवला तर शिवसेना नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com