राम मंदिरासाठी नरेंद्र मोदींचं नाही तर राजीव गांधींचं योगदान, दिग्गज भाजप नेत्याकडून घरचा आहेर

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आता केवळ तीन दिवस राहिले आहेत. अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. असे असताना भाजपचे खासदार आणि दिग्गज नेते सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राम मंदिरासाठी पंतप्रधानांचं काहीही योगदान नाही. सगळ काम आणि कोर्टातली लढाई आम्ही लोकांनी केली आहे. त्यात राजीव गांधी यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

तुम्हाला भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं नाही का ? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, निमंत्रण मिळालं असतं तरीही मी कार्यक्रमाला गेले नसतो. पंतप्रधानांचं यात काहीही योगदान नाही. ज्यांचं योगदान आहे त्यांची नावं मी दिली आहेत. यात माजी पंतप्रधान राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. वाजपेयी यांनीच राम मंदिराच्या कामात अडथळे आणले होते, अशी माहिती अशोक सिंघल यांनी मला दिली होती असे स्वामी यांनी म्हटले आहे. सुब्रम्हण्यम स्वामी हे आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते अनेक वेळा वादात देखील सापडले आहेत. मात्र, राम मंदिराच्या प्रश्नावरुन थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.