‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनं ठरवावं !’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळं आता शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनं ठरवावं असं वक्तव्य भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. इतकंच नाही तर भविष्यात कोण खरं ठरतं हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

सुजय विखे म्हणाले, “के के रेंज प्रश्नासंदर्भात मी, माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि भाजपचे काही पदाधिकारी संरक्षणमंत्र्यांना भेटलो तर संरक्षणमत्र्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही जण भेटले. आता हे दोन वेगळे पक्ष आहेत. 2 वेगळे प्रवाह आहेत. त्यांचे नेते पवार साहेब आहेत. आमचे नेते मोदी साहेब आहेत. पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा की मोदी साहेबांवर याचा निर्णय जनतेनं घ्यायचा आहे. आम्ही आमची वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी त्यांची वस्तुस्थिती मांडली आहे. खोटं कोण खरं कोण या वादात मला पडायचं नाही. जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा हे जनतेनं ठरवावं. ”

पुढं बोलताना ते म्हणाले, “आता या गोष्टीवर वादविवाद करून यावर राजकारण करणं मला योग्य वाटत नाही. माझ्या रक्तात ते नाही. आमचा तो पिंड नाही. जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळं ज्यांना मोदींवर भरवसा आहे त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवावा. ज्यांना शरद पवार यांच्यावर भरवसा आहे त्यांनी त्यांच्यावर ठेवावा. भविष्यकाळात कोण खरं ठरतं हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.” असंही ते म्हणाले.