‘भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका, माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असे विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केले आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही. पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा. मी पक्ष सोडणार की नाही याचं उत्तर पक्षानं द्यावं. ते दिलं तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाब आणत असल्याचं काहीजण म्हणत आहेत. मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात.’

पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केलीतसेच मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/