नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात स्थगिती दिली आहे. त्यानंतर राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध वातावरण तापलं आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठींबा नव्हता. मी शिवसैनिक आहे म्हणून मला माहिती आहे.’ अशा शब्दात नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जी पावलं आता टाकत आहेत. तशा बैठका सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी का घेतल्या नाही ? असा सवाल सुद्धा नारायण राणेंनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभर आंदोलन करण्यात येत असताना. अशात राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने मराठा समाज अजून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

… तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न

भाजप नेते नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, ‘जो पर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत मेगा भरती कशाला ? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का ? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सरकारच्या मेगा भरती निर्णयावर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा टीका केली आहे.