सरकार 2.0 चं एक वर्ष : ‘निर्विवाद’ नेता, ‘कमजोर’ – ‘हतबल’ विपक्ष अन् ‘पावरफूल’ होत गेला ब्रॅन्ड ‘मोदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी प्रचंड जनादेशासह दुसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेवर विराजमान झाले होते. मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्षात अनेक असे निर्णय घेतले, ज्यामुळे अगोदरच कमजोर असलेल्या विरोधी पक्षाचा मार्ग आणखी कठीण झाला आहे, आणि ब्रँड मोदी पहिल्यापेक्षा अधिक मजबूत.

2014 मध्ये भाजपाला नरेंद्र मोदींच्या रूपाने एक जादुई नेता मिळाला. मोदी लाटेचा असा प्रभाव पडला की केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर राज्यातील निवडणुकांमध्ये सुद्धा मोदी फॅक्टर निर्णायक ठरला. पाच वर्षांपासून देशात भगवी लाट आहे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी जेव्हा काही राज्यांतील काँग्रेसने भाजपाची सत्ता घेतली, तेव्हा लोकसभा निवडणुकीत मोदींचा मार्ग कठीण होणार आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला होता. पण 2019 मध्ये मोठी मोदी लाट आली आणि 300 पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या. या ब्रँड मोदीमुळेच आज केंद्रासह देशात अर्ध्यापेक्षा जास्त राज्यात भगवा आहे.

मोदींचे नाव, कामावर भाजपा
देशाच्या राजकारणाच्या एका टप्प्यावर ज्याप्रकारे काँग्रेसविरोधात विरोधक एकत्र आले होते. त्याच प्रमाणे विरोधकांनी मोदींविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरुद्ध सर्व विरोधीपक्ष होते, परंतु निकाल पूर्णपणे एकतर्फी लागला. मोदींचे नाव आणि काम विजयाची हमी बनले. भाजपाची पोस्टर्स, पत्रके, बिल्ले यापासून ते होर्डिंग्जपर्यंत सर्वच सोशल मीडियात फक्त मोदीच दिसत होते.

पंतप्रधान म्हणून त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या ज्या इतर कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाला दहा वेळा विचार करायला लावतील. मोठा राजकीय धोका पत्करण्याची ताकद मोदींमध्ये आहे. त्यांच्या निर्णयांमुळे अनेकांना धक्का बसतो. नोटाबंदी, कलम 370 रद्द करणे, सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक यासारखी अनेक उदारहणे आहेत. तिहेरी तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे हे समजले की मोदी जे ठरवतात ते करून दाखवतात.

बुलेट ट्रेन सारख्या महत्वाकांक्षी योजना सांगतात की ते किती मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण कशी करायची हे त्यांना माहित आहे. उज्ज्वला योजना, शौचालये, गृहनिर्माण योजना, किसान सन्मान निधी यातून आपण समाजाला आपण काही देणे लागतो हे दिसून येते. योग दिन, हावडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प यासारख्या कार्यक्रमांमुळे जगाला मोदींची धमक दिसून आली. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्या एखाद्या आवाहनावर टाळ्या आणि थाळ्या वाजवणे, दिवे लावणे यावरून लोकांवरील त्यांची मजबूत पकड दिसून येते.

मोदींच्या हिट घोषणा, नवीन ट्रेंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शब्दांचे जादूगर आहेत. थोडक्या शब्दात ते आपला आणि आपल्या सरकारचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवतात. सबका साथ सबका विकास, मोदी है तो मुमकीन है, मैं भी चौकीदार, ना खाऊंगा ना खाने दुंगा अशा घोषणा त्यांनी दिल्लीपासून ते खेड्यापर्यंत प्रत्येक कोपर्‍यात पोहचवल्या. त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे देशातील अनेक दशकांतील जाती-धर्म आणि राजकारणाच्या खेळाचे नियम बदलले. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, पंजाब या राज्यांतील लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरून असे दिसते की भाजपा पहिली पसंती तेथे नसेल पण मोदी जेव्हा या स्पर्धेत उतरतात, तेव्हा विरोधकांची क्लिन स्वीप निश्चित असते.

सात समुद्रपार चिअर्स
कोणताही कार्यक्रम मोदीमय करणे हे नरेंद्र मोदींचे एक मोठे कौशल्य आहे. 2014च्या शपथविधी सोहळ्यात जेव्हा सार्क देशातील नेत्यांना आमंत्रित केले तेव्हाच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी मॅजिकची सुरुवात झाली. त्यानंतर, मॅडिसन स्क्वेअर ते 2019 मध्ये ह्यूस्टनमधील हाऊडी मोदी आणि 2020 मध्ये अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्पपर्यंतचे कार्यक्रम पाहिले तर मोदींकडे एखादी गोष्ट विशाल करण्याची क्षमता असल्याचे दिसते. डिसेंबर 2015 मध्ये अफगाणिस्तानातून परत येत असताना अचानक पाकिस्तानात जाण्याचा निर्णय मोदींशिवाय कोण घेऊ शकतो.

कमजोर विरोधकांनी बनवला निर्विवाद नेता
आज ब्रँड मोदी इतका शक्तिशाली आहे की यामागे मोदींची राजकीय बुद्धीमत्ता, प्रशासकीय क्षमता, मुद्द्यांचा समजूतदारपणा आहेच, पण कमजोर विरोधकांनीही त्यांना देशाचे निर्विवाद नेते बनवले आहे. कमकुवत विरोधकांमुळे मोदी मजबूत झाले असे नाही तर मोदी मजबूत आहेत, म्हणून विरोधक कमकुवत आहेत. दृष्टिकोन कोणताही असला तरी, याबाबत दुमत असू शकत नाही की, विरोधक निष्प्रभ ठरले आहेत. एक काळा तर असा आला होता की, विरोधी पक्षांचे सरकार एखाददुसर्‍या राज्यात दिसत होते.

आज काँग्रेस, टीएमसी, डावेपक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल आणि शिवसेना यासारख्या पक्षांना काही राज्यांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले आहे, पण जेव्हा मोदी स्पर्धेत असतात तेव्हा ते सर्वजण असाहय्य वाटतात. राजस्थान, छत्तीसगड, बंगाल, ओडिसा आदी राज्यांतील लोकसभा निवडणुकांचे निकाल याचा पुरावा आहेत. आज परिस्थिती अशी आहे की ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांनाही भाजपाची भीती वाटते. कर्नाटकात आणि मध्यप्रदेशात भाजपाने सत्ता उलथविण्यास यश मिळविले आहे, महाराष्ट्रात शिवसेनेची आघाडी नेहमीच भितीच्या छायेत असते.

मोदींविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण प्रादेशिक पक्षांच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षासुद्धा यात अडथळा ठरत आहेत. यूपीमध्ये सपा-बसपाने हात मिळवले, परंतु ही युती मोदी लाटेसमोर टिकू शकली नाही. आणि मोदी मागील सहा वर्षांपासून नेत नंबर 1 वर टिकून आहेत.