आगामी काळात भाजपला आंदोलनं करावी लागणार नाहीत : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार येऊन आता कुठे दोन महिने पूर्ण झाले आहेत. आम्हाला काम करण्यासाठी थोडा वेळ मिळाला पाहिजे, पण विरोधकांना फारच घाई झालेली दिसत आहे. पुढील काळात आम्ही असे काम करू की, राज्यात भाजपला आंदोलने करण्याची गरजच पडणार नाही, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन – विरोधकांची पुन्हा आंदोलने
राज्यच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून, कामकाजाला विधिमंडळात जाण्या अगोदर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपने शेतकरी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की विरोधी पक्षांत असल्यावर आंदोलने करावी लागतात, तो प्रत्येक विरोधी पक्षाचा अधिकार आहे.

आम्ही सुद्धा विरोधी पक्षांत असताना विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलने केली आहेत. कालचे भाजपचे आंदोलन पाहून मला आमचे मागचे दिवस आठवले. कर्जमाफी योजनेला सुरुवात झाली असून, पुढील दोन ते तीन महिन्यात ती योजना पूर्ण होईल असे ही यावेळी अजित पवार म्हणाले.