भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं अत्यंत वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर मला कोरोनाची बाधा झाली तर मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी केलं. बरुईपुर येथे रविवारी दुपारी हाजरा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी वार्ताहारांशी संवाद साधताना हे विधान केलं. दरम्यान, हाजरा यांच्या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशात कोरोनाचा प्रसार वाढत असताना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपुर येथे भारतीय जनता पार्टीकडून राजकीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यावेळी तेथे जमलेल्या हजारो भाजपा कार्यकर्त्यांनी ना मास्क परिधान केले होते ना सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं होते. यासंदर्भात पत्रकारांनी अनुपम हाजरा यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘कोरोना-१९ पेक्षा खूप धोकादायक परिस्थितीसोबत आमचे कार्यकर्ते लढत आहेत, ते ममता बॅनर्जी यांच्याशी लढत आहेत. कारण त्या कोविड-१९ संसर्गा मुळे प्रभावित नाहीत आणि त्यांना कोणाची भीती नाही, तसेच जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी पीडितांना अत्यंत चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाचे मृतदेह रॉकेलने जाळले आहेत. आम्ही अशा प्रकारचे कृत्य कुत्रा आणि मांजरासोबत सुद्धा करत नाही, असे हाजरा यांनी सांगितलं. तथापि, तृणमूल काँग्रेसने या विधानावरुन हाजरा यांना लक्ष करत ते मानसिकदृष्टया अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, हे विधान करणारा व्यक्ती वेडा आणि अपरिपक्व असू शकतो. जो हाजरा यांचे विधान ऐकेल त्याला समजून जाईल की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये असलेल्या अनुपम हाजरा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधी भाजपात प्रवेश केला. शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यानुसार हाजरा यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like