मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील शिवसैनिकाचा ‘तो’ बंदुकीचा व्हिडीओ व्हायरल, निलेश राणे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून, त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यातच आता भाजपनेही शिवसेनेवर टीकास्त्र डागल आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, “ज्या पद्धतीने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ते पाहता राज्याचे युवा नेतृत्व सरकारमध्ये बसून पब, पार्टी आणि फिल्मी दुनियेचा पुरस्कार करते, त्यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर नंगानाच करुन गोळी मारो भेजेमे अशा स्टाईलने वागतात,” अशी टीका त्यांनी केली आहे.

तर “चालत्या गाडीतून पिस्तूल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??,” असा संतप्त सवाल भाजपचे नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. तसेच, या व्हिडिओत गाडीचा क्रमांक सुद्धा स्पष्ट दिसत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यावरती काय कारवाई करतात याकडे विरोधकांपासून सर्वांचे लक्ष लागले आहे.