संजय राठोडांच्या राजीनाम्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीनं गुन्हा दाखल व्हावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं अडचणीत आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे ?

निलेश राणे म्हणाले, राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. परंतु आता इथून पुढं चौकशी कशी होणार ? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा. वनमंत्र्यांनी दिलेला राजीनामा उद्धव ठाकरे स्विकारणार का हेही पहावं लागेल असंही राणे म्हणाले.

‘ठाकरे सरकारनं आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं’

पुढं निलेश राणे म्हणाले, विरोधी पक्षानं एक दबाव निर्माण केला, त्यातून हा राजीनामा दिला गेला आहे. हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारनं आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं आहे. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी.

‘एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रातून जाणार’

निलेश राणे म्हणाले, भाजपच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणात धमक्या आल्या. परंतु मला त्यांना सांगायचंय की, महाराष्ट्र यांच्या बापाचा नाहीये. एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रातून जाणार हेही लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय ?

बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. इतकंच नाही तर 8 दिवसांपासून संजय राठोड गायब असल्यानं भाजप नेते अधिकच आक्रमक झाले होते.