नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे कसले ब्रेक द चेन, हे तर चेक द ब्रेन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 13) पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात आज ( दि.14) रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा केली. तसेच या काळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी 5476 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. दरम्यान यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे ब्रेक द चेन नव्हे, तर चेक द ब्रेन आहे, असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

 

 

 

 

नितेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगल वाटत असेल असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र सोडले आहे. राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्र्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला, तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याची तीव्र प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.