Video : कोविडविरूध्दच्या लढयाचं नेतृत्व सोपवण्याच्या ‘त्या’ वादग्रस्त नेत्याच्या मागणीवर गडकरींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अमरावती: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची अवस्था बिकट केली आहे. मोदी सरकारला हि परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका काही दिवसापासून होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात पंतप्रधान कार्यालय काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी देशात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. त्यावर वर्धा येथे नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गडकरी म्हणाले, माझे काम उत्कृष्ट आहे वगैरे असे काही नाही. माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे समाजात अनेक लोक आहेत. पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. मी सामाजिक दायित्वातून पुढाकार घेतला. या लढ्यात कोणीही जात,धर्म, भाषा, पक्ष न आणता मानवतेच्या आधारे सर्वानी सेवा केली पाहिजे. सर्व लोक करतच आहेत पण आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत. असे त्यांनी म्हंटले.

 

 

 

 

 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. गडकरी यांच्या माध्यमातून अगदी कमी वेळात परवानगी मिळवून वर्ध्याच्या औद्योगिक परिसरात जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिविर औषधाच्या उत्पादनास सुरुवात झाली आहे. कमी वेळात केंद्र सरकारची परवानगी मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीत दररोज तीस हजार कुप्यांची निर्मिती होईल. दरम्यान गुरुवारी गडकरी यांनी कंपनीस भेट देऊन उत्पादनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गरजू गरिबांना शासकीय दराने हे औषध उपलब्ध होईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

स्वामींनी काय म्हटलं आहे

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसापूर्वी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही असं म्हंटल होत. इस्लामिक आक्रमण आणि ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनंतरही ज्या प्रमाणे भारत टिकून राहिला त्या प्रमाणे कोरोना महामारीच्या संकटातही सामना करत टिकून राहील. आताच आपण नीट काळजी घेतली नाही, निर्बंध लावले नाही तर यांचा मुलांवर प्राणिनां करणारी आणखी येईल. त्यामुळे मोदींनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी असेहि त्यांनी सांगितले होते. दरम्यान,पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे ध्यानात घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली जात आहे, त्यावरही त्यांनी चोख उत्तर दिले. ते म्हणाले, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिलं जात नाही. अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते मात्र नक्की नाहीत. ते खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल अशी अपेक्षा त्यांनीही व्यक्त केली.