Aurangabad News : भाजप पदाधिकाऱ्यांची शिवसेनेच्या मंत्र्याला शिवीगाळ ! 3 जणांविरोधात FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केलं यावेळी हा प्रकार पहायला मिळाला.

औरंगाबाद जळगाव महामार्गावर आज सकाळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नगरपरिषद आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तोल सुटला. या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांचा एकेरी उल्लेख केला. जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे यांनी या प्रकारानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळ करणाऱ्या 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजपचे दोन पदाधिकारी नगराध्यक्ष कमलेश कटारिया, अमोल ढाकरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली अशा 3 जणांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.