
BJP On Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘तुम्ही ज्या इंडी आघाडीत आहात त्यांनी 14 पत्रकारांवर…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP On Supriya Sule | पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते. याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. (BJP On Supriya Sule)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (BJP On Supriya Sule)
तसेच, पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
त्या बेजबाबदारपणाबद्दल कधी माफी मागणार?
सुप्रिया सुळे यांच्या टीकेला भाजपने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करुन प्रत्युत्तर देताना म्हटले, सुप्रिया ताई लोकशाहीचा चौथ्या स्तंभ राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवतो हे तुम्ही मान्य केलं याबद्दल आपले आभार. कारण तुम्ही ज्या इंडी आघाडीत आहात त्यांनी 14 पत्रकारांवर बहिष्कार टाकला आणि पुन्हा आणीबाणी लादली. एवढंच नाही तर यापूर्वी सत्तेत असताना तुम्ही पत्रकारांना कशा पद्धतीने घरातून उचलून अटक केली. करोना काळात त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल केले हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे.
तुमचं मविआ सरकार असताना विरोधात बोललं म्हणून संपादक अर्णब गोस्वामी यांना तुरुंगात डांबलं, बातमी दिली
म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली, अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल केले.
लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली त्या बेजबाबदारपणाबद्दल कधी माफी मागणार? असा सवाल भाजपने सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
राहिला प्रश्न बातमीचा तर पत्रकारांशी संवाद साधणं, सरकारनं, पक्षानं केलेल्या कामाची माहिती देणं यात काय चूक आहे?
कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी संपर्कात राहून पक्षाची भूमिका मांडली पाहिजे.
नाही तर माध्यमातून एकतर्फी भूमिका लोकांसमोर येईल, असेही भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा