तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण : खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्या – पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यात तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ याच्यात लक्ष घातल पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे. फक्त यासंबंधी बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे, असे पंका मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटल आहे.

या प्रकररणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पंकजा मुंडे यांनी दिवाळीच्या दिवशी असे काही बोलावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण स्वत: यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण :
बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.