मुख्यमंत्री होणार का ? पंकजा ताईंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसोबत जातीय जनगणना व्हावी. त्यातून सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपाययोजना करायला सोपे जाईल, असे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. त्या औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

दरम्यान, जालन्यात रविवारी झालेल्या ओबीसी मेळाव्यात पुढील मुख्यमंत्री ओबीसी असावा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर वार्ताहरांनी विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला यापासून थोडे दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे.”

“गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडली. प्रीतम मुंडे यांनी सुद्धा संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना सुरु होणार असून, त्यासाठी सकारात्मक पाऊले पडली पाहिजे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यात प्रत्येक गोष्ट समोर येईल. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असेही मुंडे यांनी म्हटलं.

धनंजय मुंडेंबाबत पंकजा मुंडे यांनी सोडले मौन
“तो विषय बऱ्यापैकी मागे राहिला असून, नैतिकदृष्टया, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्टया या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. मात्र, कोणत्याही अशा गोष्टींमुळे एखाद्या कुटूंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटूंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो. मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही,” असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.