Maratha Reservation : भाजप नेत्या पंकजा मुंडेची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मराठा समाज बांधव विचारताहेत, आमचा प्रामाणिक नायक कोण?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) महत्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ट्विट करत यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज बांधव आता आमचा प्रामाणिक नायक कोण, अशी विचारणा करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असे खरेच कोणाला वाटले होते का ? मराठा जीवनातील संघर्ष हा मोर्चा, बैठका, आरोप -प्रत्यारोप आणि राजकारणाखाली दबून गेला… झाल तर मी मी नाही तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाईसमोर आहे.

आमचा प्रामाणिक नायक कोण ? कोण खरा टक्का आरक्षणाचा सांगेल आणि देईल हा प्रश्न मराठा समाज बांधव विचारत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1992 मध्ये इंद्रा सहाणी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा घातली होती. 9 सदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणावर निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी दरम्यान बुधवारी निर्णय देताना, गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून, आरक्षण देणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. .