वडिल गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा ‘भावूक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्ताने कार्यक्रम होणार आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यक्रम लाइव्ह होणार असून कोणीही गर्दी करु नये असे आवाहन केले आहे. घरातच त्यांच्या फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करण्याचे त्यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 3 जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले आहे. समर्थकांना दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करु नका असेही आवाहन त्यांनी केले आहे . 3 जूनचा दिवस संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असता.

पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी कोरोनामुळे काळजी आणि लॉकडाउनच्या नियमांचे पालन करायचे आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही. पुण्यतिथीला नागरिकांनी घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा. असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.