पंकजा मुंडेच्या नव्या ’छंदा’ची चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन नाराज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटरवर नव्या छंदाविषयी पोस्ट केली आहे. त्यांनी काढलेले चित्र शेअर करताना लिहिलेल्या शब्दांवरून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर भावनिक ट्वीट केले होते. आता शून्यापासून सुरू केले आहे असे म्हणणार्‍या पंकजा मुंडे यांच्या मनात काय आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांनी भावनिक ट्वीट केले होते. वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’, असे पंकजा यांनी म्हटले होते.काल संध्याकाळी पंकजा यांनी ट्वीट करत नव्या छंदाविषयी माहिती दिली आहे. स्वतःच स्वतःला शिकवते आहे. असे त्यांनी चित्राबद्दल म्हटले असले तरी याचा राजकीय अर्थ आहे का याची चर्चा होते आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीत सिंह मोहिते यांच्यासह डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापत भाजपने आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती. त्यामुळे साहजिकच निवडणुकीतील प्रत्येक मोठ्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचवेळी दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती.