भाजपाचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘CM ठाकरेंनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात, शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती चिंताजनक आहे, असे म्हणत लाड यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले. त्यातील 11,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये 3675 सक्रिय रुग्ण असून केवळ 1015 इतक्याच बेड्सची व्यवस्था आहे. तर रत्नागिरीत सध्या 27 हजार 677 रुग्ण असून 19, 448 रुग्ण बरे झाले आहेत. गावागावातील लोक तसेच काही सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यात शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही फिरकताना दिसत नाहीत, असा गंभीर आरोप देखील लाड यांनी केला आहे. सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे का असेना पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी अशी विनंती लाड यांनी केली आहे.