भाजप नेत्यामध्ये आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली; दरेकर म्हणाले – ‘ताटात आहे तेवढंच देणार ना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्ससारख्या सुविधा मिळत नाही. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. ’18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मोदींनी मान्यता दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु आहे. पण आता जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा’, असा टोला दरेकर यांनी लगावला.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर याचा प्रचंड ताण येत आहे. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा झाल्याने राज्य सरकार केंद्राकडे तात्काळ मदत मागत आहे. मात्र, त्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ऑक्सिजनचा कमी पुरवठा केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला सुनावले. राज्यातील मुद्द्यांवर केंद्राशी बोललो, तर पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात आले. पीपीई किट, व्हेंटिलेटरही केंद्राने महाराष्ट्राला कमी दिले, असे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.

जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले, ‘राज्य सरकारने कोरोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काय केले? याचा आकडा सर्वांसमोर आला पाहिजे. केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिवाय राज्य सरकारचा एकही दिवस जात नाही. केंद्राने दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचे घोषित केले असताना तो आणण्याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी साधे 32 टँकर उपलब्ध करु शकत नाही.