…तर कारवाईचे आदेश द्या; दरेकरांचे राऊतांना खुले आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आव्हान देत म्हटले, की ‘आम्ही रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहोत, असे सरकारला वाटत असेल, तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या’.

भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण श्रेयासाठी हे सर्व घडवून आणले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याचा समाचार घेत दरेकर म्हणाले, ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत राजकारण केले गेले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला संजय राऊत यांनी आम्हाला वेळ घेऊन द्यावी. कारण मुख्यमंत्री सव्वा वर्षात विरोधी पक्ष नेत्यांना फक्त दोनवेळा बैठकीच्या निमित्ताने भेटले. ज्या गोष्टी सुचवल्या त्यातील एकही गोष्ट त्यांनी केली नाही. तसेच आरोग्यमंत्र्यांनाच चर्चेसाठी वेळ मिळत नाही, त्यांना जे निर्णय अपेक्षित आहेत, ते घेता येत नाहीत, अशी त्यांच्याच सरकारमधील आरोग्यमंत्र्यांची ही खंत आहे’, असेही ते म्हणाले.

सरकारच्या सर्व प्रमुखांशी

देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून महाराष्ट्रासाठी या कंपनीकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळू शकतात, असे मी दमणला गेल्यानंतर मंत्री राजेंद्र शिंगणेजी यांना फोन करून आश्वस्त केले. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललो. सार्वजनिक आरोग्य, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी बोललो. अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी आणि या विभागाच्या सचिवांशीही बोललो. सरकारच्या सर्व प्रमुख लोकांशी बोललो. मंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यांनीच अनुकूलता दाखवली, असेही दरेकर यांनी सांगितले.