×
Homeशहरमुंबईभाजपचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले - 'प. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर...

भाजपचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘प. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. येथे भाजपचा दारुण पराभव झाला आहे. मात्र यानंतर आता बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यावरून आता महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने आता शिवसेनेवर टीका केली आहे. वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?, अशी विचारणा करत सेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर सुरु केलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज बुधवारी (दि. 5) महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने करणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा टीएमसीने आपला गड कायम राखला आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, लूटमारीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. विचारांची लढाई विचारांनी लढावी. तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून हे थांबले पाहिजे. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? अशी विचारणा दरेकरांनी ट्विटच्या माध्यमांमातून केली आहे. तसेच बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पण आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबावी. जय श्रीराम असे दरेकरांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Must Read
Related News