Pravin Darekar : ‘कोरोनावर उपाययोजनेपेक्षा तुमचे पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष’ (Video)

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्यापेक्षा ठाकरे सरकारचे पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

 

 

 

प्रवीण दरेकर यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह संपूर्ण राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वतःची पाठ थोपटत बसले आहे. कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुक वाटत नाही पण आमचे म्हणणे हेच आहे की, राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन असलेले बेड मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाही असा दावा दरेकरांनी केला आहे. आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेतील कमतरता दूर करा, त्यासाठी आम्ही सगळे सोबत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. एखादी पीआर एजन्सी नेमून, बातम्या पेरुन आपले कोडकौतुक करायचे हे आता बास करा. लोकांना आता समजू लागले आहे की तुमच्या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना करण्याऐवजी यांचा जास्त वेळ पब्लिसिटी स्टंटमध्ये जात आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला प्रचंड गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच आज राज्यातील आरोग्यव्यवस्था टिकून आहे. तरीदेखील हे केंद्रावर टीका करतात, असे दरेकर म्हणाले.