शरद पवार, अजित पवार नव्हे तर ‘यांच्या’मुळं झालं भाजपचं नुकसान : अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेत असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोठं विधान केले आहे. मागील 30 वर्षापासून असलेली भाजपची मैत्री आणि गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय घडामोडीवर त्यांनी अनेक खुलासे पुन्हा एकदा केले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमांना शिवसेनेला जबाबदार ठरवले आहे. निकाल आल्यानंतर लगेच शिवसेनेने अटी घालण्यास सुरुवात केली. मात्र, मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असे आम्ही ठामपणे निश्चित केले होते. अनेक सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आक्षेप घेतला नाही, असे अमित शहा म्हणाले.

भाजपला ज्यावेळी अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तेव्हाच त्यांनी दबावाचे राजकरण केले. मुख्यमंत्री पदाचे आश्वासन भाजपने शिवसेनेला कधीच दिले नव्हते. जर आश्वासन दिले असते तर शिवसेनेकडून किमान एक फोन तरी केला असता. तरी त्यावर चर्चा करता आली असती. आम्ही विचारधारेशी तडजोड केली नाही त्यामुळेच महाराष्ट्रात वेगळे चित्र पहायला मिळत असून वेगळे सरकार अस्तित्वात आले.

काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले, अनेकदा विचार करुन निर्णय घेतले जातात. मात्र काही घटना अशा घडतात की त्यामुळे तुम्ही ठरविल्या प्रमाणे होत नाही. काँग्रेस नेहमीच शिवसेनेचा विरोध करत आली आणि सत्तेसाठी शिवसेनेसोबत जाऊन बसले असल्याचे अमित शहा म्हणाले. तसेच महाराष्ट्रात शरद पवार किंवा अजित पवारांमुळे भाजपचे नुकसान झाले नाही तर आमच्या मित्राने आपलं मनपरिवर्तन केल्यामुळे आमचं नुकसान झालं, अशी टीकाही त्यांनी शिवसेनवर केली.

Visit : Policenama.com