‘मेरा परिवार, भाजप परिवार’ उपक्रमाची सुरुवात अमित शहांपासून

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुका विचारात घेता राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काहींनी प्रचार माेहिमांना सुरुवातही केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभांचा नारळही फोडला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले जाताना दिसत आहे. सत्ताधारी भाजपाने ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ तसेच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ हे उपक्रम लाँच केले आहेत. यातील ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाची सुरुवात अमित शहा यांच्या घरापासून करण्यात आली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाची घोषणा केली होती. यानंतर त्यांनी आता या उपक्रमाला सुरुवात देखील केली आहे. त्यांनी आपल्या अहमदाबाद येथील निवासस्थानापासून ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. जे भाजपाचे समर्थक आहेत त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्यात येणार आहे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आज शहांनी आपल्या निवासस्थानावर भाजपचा झेंडा लावला. यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे ही उपस्थित होते. आता या उपक्रमा अंतर्गत जे जे भाजपाचे समर्थक आहेत त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्यास सुरुवात होणार आहे.

‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाबरोबरच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ याही उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या उपक्रमात देशातील जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहे. शिवाय यानंतर भाजपा आपला जाहीरनामा तयार करणार आहे. मुख्य म्हणजे यासाठी भाजप १० कोटी लोकांची मते जाणून घेणार आहे.