…म्हणून राहुल गांधींनी केरळला पळ काढला : अमित शहा

बिजनोर : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षामध्ये अमेठीमध्ये काय विकास  केला ? याचे उत्तर मतदार मागतील म्हणूनच घाबरून राहुल यांनी केरळला पळ काढल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला. उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे सभेत शहा यांनी हे विधान केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी बरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मी व्हॉट्सॲपवर वाचले की राहुल गांधी अमेठी सोडून केरळकडे पळत आहेत.  गेल्या काही वर्षामध्ये अमेठीमध्ये काय विकास केला? याचे उत्तर मतदार मागतील म्हणूनच राहुल यांनी केरळला पळ काढला आहे. ते ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या जोरावर विजय मिळवण्यासाठी केरळला जात आहेत.’

https://twitter.com/ANINewsUP/status/1112269264277389312

इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया –

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरेसह दक्षिणेकडेही मोर्चा वळवल्याने त्यांच्यावर राजकीय प्रतिक्रियांच्या फैरी झाडत आहेत.  वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा राहुल गांधींचा निर्णय डाव्यांना पटलेला नाही. वायनाडमध्ये राहुल गांधींना पराभूत करण्याची प्रतिज्ञा डाव्यांनी केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन म्हणाले की , ‘भाजपा निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातून राहुल गांधींनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. पण ही डाव्यांविरोधात लढाई आहे.  वायनाडमधून त्यांना आम्ही आव्हान देणार आहे. आम्ही राहुल गांधींविरोधात लढणार आहोत.’

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी अमेठीतून जिंकण्याबाबत साशंक असल्यानेच दोन ठिकाणांहून लढण्याच्या विचारात असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी राहुलना रणछोडदास गांधी उपमा दिली. मोदींच्या त्सुनामीमुळे त्यांनी दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की निवडणूक कोठून लढवायची हा त्यांचा प्रश्न आहे, पण ते घाबरले आहेत की नाही ते मला कसं माहित होणार असेही त्या म्हणाल्या.