भाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवीन टीम ! विनोद तावडेंसह पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी ! खडसेंना पुन्हा डावललं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे पी नड्डा यांनी पक्षाची नवीन टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातील 2 मोठ्या नेत्यांची नावं आहेत. नड्डा यांनी भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातील 4 तरुण चेहरे यात दिसत आहेत.

नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षीत निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त होतं. विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चेला आणखीच उधाण आलं होतं. परंतु आता पक्ष कार्यकारिणीत पंकजा यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

विनोद तावडेंना तिकीट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षानं राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण 13 जणांना नॅशनल सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं आहे. यात महाराष्ट्रातील 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत.

याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्यांक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.

खडसेंना पुन्हा डावललं

भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या तोंडाला पानं पुसली आहेत. खडसे गेल्या काही महिन्यात सातत्यानं महाराष्ट्रात फडणवीसांविरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्र भाजपला शालजोडे दिले आहेत. परंतु केंद्रीय पातळीवरील भाजप नेतृत्वानं पुन्हा एकदा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसेंच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा आहे. हेही त्यामागील एक कारण असू शकतं.

अमित शाह यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर भाजपच्या संघटनेत अध्यक्ष म्हणून नड्डा यांनी मोठे बदल केले नव्हते. मोदी-शाहा यांच्या खांद्यावरच पक्षाची खरी जबाबदारी आहे असं बोललं जात होतं. पक्षाचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे पी नड्डा यांनी अखेर पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या व्यतिरीक्त छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि एकूण 12 नेते राष्ट्रीय उपाध्य हेत. आता बड्या नेत्यांच्या सल्ल्याने पण तरुण आणि नव्या विचारांच्या नेत्यांसह पक्ष काम करणार आहेअसं नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे.