काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याकडून मुलासाठी भाजपचा प्रचार ?

राधाकृष्ण विखे पाटलांची पुत्रासाठी बंडखोरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाचा परंपरागत विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू केला आहे. आज त्यांनी पुत्रप्रेमापोटी बंडखोरी करून भाजपच्या डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. आई-वडिलांच्या कल्पना न देता मी हा निर्णय घेतला आहे, असे डॉ. सुजय विखे यांच्याकडून सांगण्यात येत होते. माझ्या प्रचाराला आई-वडिलांना बोलले नाही, असे ते वारंवार पत्रकारपरिषदेत सांगत असायचे. मात्र आज त्यांचे वडील विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे यांचे म्हणणे खोटे ठरवले आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडखोरी करीत पक्षाचा परंपरागत विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार सुरू केला आहे. त्यांनी आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी बेलवंडी व श्रीगोंदा शहरात जुन्या समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन लोकसभा निवडणुकीत पुत्र सुजय यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्यासोबत काँग्रेसने काल रात्री उशिरा जिल्हाध्यक्षपदावरून डच्चू दिलेले जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, बाळासाहेब गिरमकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचा प्रचार सुरु केला आहे. भाजप उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेलार भाजपाच्या वळचणीला !
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले अण्णासाहेब शेलार हे देखील भाजपच्या वळचणीला आले आहेत. ते आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात श्रीगोंदा तालुक्यात फिरत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय यांच्या मुंबईतील प्रवेशादरम्यान त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.