महिला अत्याचार विरोधात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी वाघोलीत भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा युवा मोर्चा व हवेली तालुक्याच्या वतीने निषेध वक्त करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, महिलांवर वाढते अत्याचार झोपेचे सोंग घेतलेल्या महाआघाडी सरकार दिसत नाही , सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना भाजपाच्या संगिता जगताप म्हणाल्या की महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रभर महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या गंभीर काळात देखील कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे या कडे देखील सरकारचे लक्ष नाही अशा तीव्र शब्दात या सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा सचिव पूनम चौधरी, पुणे जिल्हा सचिव संगीता जगताप, हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदिप सातव, जयप्रकाश सातव, विजय जाचक, गणेश सातव, शरद आव्हाळे, केतन जाधव हे भाजप कार्यकर्ते उपस्तित होते.