PM मोदी, HM शहा, 6 CM, 9 मंत्री, 100 पेक्षा जास्त BJP खासदारांनी दिल्लीत लावली ‘ताकद’, तरी सुद्धा ‘पराभूत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या रणधुमाळीत अखेर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. तर भाजपा आणि काँग्रेसचा पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुक 2020 चे विजेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ठरले आहेत. भाजपाने या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली होती. परंतु दिल्लीच्या सिंहासनावरून अरविंद केजरीवाल यांना खेचण्यात भाजपाला यश आले नाही.

दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, 6 मुख्यमंत्री, 9 मंत्री आणि 40 पेक्षा जास्त स्टार प्रचारकांनी प्रचार केला होता. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने 100 पेक्षा जास्त खासदारांना रणांगणात उतरवले होते. परंतु डोंगर पोखरून उंदीर सापडल्यासारखी अवस्था सध्या भाजपाची झाली आहे.

दिल्लीची निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 2 रॅली केल्या. राहुल गांधी यांनी 4 रॅली केल्या. अरविंद केजरीवाल यांनी 3 मोठे रोड शो केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 दिवस भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचारातून आपला जोर दाखवला.

भाजपाने पक्षाच्या 100 दिग्गजांना प्रचारासाठी जुंपले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी अधिसूचनेच्या सुमारे 25 दिवस आधी द्वारकामध्ये भारत वंदना पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रचाराची सुरूवात केली होती. नंतर ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करत होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 3 मोठे रोड शो केले. याशिवाय छोट्या – छोट्या सभा घेतल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणामुळे एकही रॅली केली नाही. शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी चार-चार प्रचार रॅली केल्या.

आपने 39 नेत्यांना स्टार प्रचारक बनवले होते. यापैकी 18 जण निवडणूक रिंगणात होते. 6 प्रसिद्ध चेहरे ज्यामध्ये केजरीवाल, सिसोदिया आणि संगीतकार विशाल ददलानी होते. तर भाजपाने 40 नेत्यांना स्टार प्रचारक बनवले होते. दोन स्टार प्रचारक अनुराग ठाकुर, प्रवेश वर्मा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रचार बंदी घालण्यात आली होती.

काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. परंतु यापैकी मोजकेच नेते रॅली आणि सभांमध्ये दिसले. माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी वैयक्तिक कारण सांगून परदेशात जाणे पसंत केले.

भाजपाकडून पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी मैदानात सक्रिय होते. निवडणुकीची सर्व सूत्र गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात होती. तर भाजपाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.

काँग्रेसकडून सुभाष चोपडा यांना निवडणुकीच्या 106 दिवस आधी प्रदेश अध्यक्ष बनविण्यात आले. त्यांच्या अगोदर 3 महिने हे पद रिक्त होते. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनानंतर काँग्रेसकडे कोणताही चेहरा शिल्लक राहिलेला नाही.

भाजपाने दिल्लीत 4500 चौकसभा घेतल्या. भाजपा सूत्रांनी शेवटच्या टप्प्यात सांगितले होते की, पार्टीचे दोन्ही सभागृहातील 370 खासदार दिल्ली निवडणुकीचा प्रचार करतील. हे खासदार विविध मतदारसंघात रोज रात्री जाऊन भाजपासाठी मते मागतील.

यापूर्वी भाजपाने 9 केंद्रीय मंत्री, 35 पदाधिकारी, 6 मुख्यमंत्री, 3 माजी मुख्यमंत्री, 8 खासदार, 38 माजी मंत्री-खासदार यांना प्रचाराला जुंपले होते. परंतु दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना विजयी होण्यापासून रोखण्यात भाजपाची फौज कमी पडली.