ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचं आणखी एक पाऊल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर हत्याकांडानंतर बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून राज्यातील ठाकरे सरकारला भाजपकडून वारंवार टारगेट करत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात आता भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मानव अधिकार आयोगाकडे राज्यातील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर तक्रार केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती, कंगना रणौतची बदनामी तसंच माजी नौदल अधिकाऱ्याला केलेली मारहाण या मुद्द्यांवरून भाजप खासदारांनी मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वात खासदार भागवत कराड आणि विकास महात्मे यांच्या शिष्टमंडळानं मानव अधिकार आयोगाला निवेदन दिलं आहे. राज्यात मानव अधिकारांचे उल्लंघन होत असून मानव अधिकार आयोगानं लक्ष द्यावं ही विनंती करण्यात आली आहे.

यापूर्वीच सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपनं केला होता. त्यानंतर आता मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी भाजपकडून पूर्ण ताकदीसह प्रयत्न केले जात असल्याचं चित्र दिसत आहे.