‘…तर तिथेच राजीनामा दिला असता’ शपथविधी वादावर उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेचे नवनिर्वाचीत सदस्यांना बुधवारी शपथ देण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यासह काही खासदारांनी शपथ घेतली. साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषावर आक्षेप घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुडले आहे. या वादावर आता स्वत: उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी सांगितलं. त्याच्यावर वाद विवाद होत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता मी गप्प बसणार नाही. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजेंचा काँग्रेसवर आरोप
ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस का राष्ट्रवादीचे माला माहित नाही. जे घडले ते भासविण्याचा प्रयत्न करु नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर ‘तोंड बंद’ आंदोलन सुरु झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि समर्थकांना जाब विचारला आहे.