‘सचिन वाझेंची तात्काळ नार्को टेस्ट करा, खरा चेहरा समोर येईल’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटक प्रकरणातील ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे वाझेंच्या अटकेने खळबळ उडाली आहे.दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी असे कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे. तसेच अशी कोणती नाव आहेत, ज्यांना सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत आहे?, नार्को टेस्ट करा, जेणेकरून शिवसेना आणि राज्य सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे कदम यांनी म्हटले आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे शनिवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेंव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना एनआयएने अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. अखेर त्यांना NIA ने अटक केली आता राज्य सरकारने देशाची माफी मागत वाझेंची Narco टेस्ट करणार का? असा सवाल कदम यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना स्वत: याच उत्तर द्यावे लागेल असे म्हटले आहे. आज वाझेंना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सचिन वाझेंची बदली झाल्यानंतर त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आल्याचे सूचक स्टेट्स वाझेंनी ठेवल्याने खळबळ उडाली होती.