जळगाव : एकनाथ खडसेंचा धमाका ! भाजपचे 13 नगरसेवक राष्ट्रवादीत; आता आली भाजपची प्रतिक्रिया

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यात भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला पक्षात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर, १४ फेब्रुवारीला भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह १३ नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीचा स्कोअर कमी करणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे, भुसावळात भाजपला या झटक्यातून सावरावे तर लागेलच शिवाय राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सक्षम पर्याय देखील वेळीच उभा करावा लागणार आहे. यासाठी पक्षाकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

दरम्यान, आता खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील १३ नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली खेळी ही भाजपच्या अडचणी वाढवणारी असून, जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. दुसरीकडे, भुसावळात अलिकडे घडलेल्या घडामोडी या भाजपच्या चिंता वाढवणाऱ्या असल्या तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका मांडताना माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले की, “आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले. मूलभूत सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. भाजपातील मुस्कटदाबी सहन करायची नाही म्हणून नगरसेवकांचा एक मोठा गट आमच्याकडे आला आहे. भुसावळ शहराचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील राहू. शहराचा विकास राष्ट्रवादीशिवाय होणार नाही, हे जनतेला माहिती झाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपला पिछाडीवर ठेऊ असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले की, “आमचे काही नगरसेवक नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. मात्र, कुटुंबीय आणि समर्थकांचा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष थांबत नसतो. एक जण गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की दुसऱ्याला संधी मिळत असते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी करू. पक्षातील नव्या लोकांना संधी, जबाबदारी देऊ”