भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही ‘या’ 2 जेष्ठ नेत्यांचा पत्ता कट

लखनौ : वृत्तसंस्था – राम मंदिर उभारणीवर देशभर सर्वप्रथम रथयात्रा आयोजित करुन भाजपला उत्तर प्रदेशात स्वतंत्र स्थान निर्माण करुन देणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि आतापर्यंत उत्तर प्रदेशातूनच निवडून येणारे पक्षाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या यादीतूनही पत्ता कट करण्यात आला आहे.

सपा आणि बसपा यांच्यामध्ये झालेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशात भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच काँग्रेसने प्रियंका गांधी यांना प्रचारात उतरविले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांची यादी निवडणुक आयोगाला सादर केली. त्यात या दोन ज्येष्ठ नेत्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने भाजपचे जुणे जाणते कार्यकर्ते नाराज झाले आहे.

सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील ४० स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती यांचा समावेश आहे.