सोलापूर मतदारसंघ : गड कायम राखण्यासाठी भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने या निडणुकीत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. त्यानंतर गत पाच वर्षात भाजपने या मतदारसंघात विजय कायम राखण्यासाठी अमाप कष्ट केले आहेत. त्याच प्रमाणे कोणत्याही परिस्थितीत भाजपला हा मतदारसंघ गमवायचा नाही म्हणून सध्या भाजप या मतदारसंघात सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या बद्दल सध्या पक्षात नाराजी आहे. त्यांनी मतदारसंघात हवा तसा जनसंपर्क ठेवला नाही म्हणून पक्ष आता त्यांना फेर उमेदवारी देण्यासाठी तयार नाही. तर राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष अनुकूल आहे मात्र स्थानिक कार्यकर्ते मात्र साबळे यांना नवखा उमेदवार म्हणत आहेत. दगडापेक्षा वीट मऊ म्हणल्या प्रमाणे साबळे पेक्षा विद्यमान बनसोडे ठीक राहतील असे स्थानिक कार्यकर्त्यांना वाटते. तर नव्याने दाखल झालेल्या लक्ष्मण ढोबळे यांच्या सोलापूर लोकसभा उमेदवारी बाबत बोलायला कुणीच तयार नाही. ना नेते ना कार्यकर्ते, कुणीच ढोबळे सरांच्या उमेदवारी बद्दल बोलत नाही. त्यामुळे ढोबळे सर उमेदवारीच्या स्पर्धेत तरी आहेत का असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

दरम्यान भाजप गौडगावचे जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावाचा देखील उमेदवारीसाठी विचार करत आहे असे देखील सूत्रांनी सांगितले आहे. सोलापूर मतदार संघात लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याचे महास्वामींची उमेदवारी लिंगायत मतदारांना खुश करण्यासाठी चांगली ठरेल असे भाजप नेत्यांचे मत आहे. तर महास्वामी हे तसे नवखे उमेदवार असल्याने भाजपच्या स्थानिक गटबाजीला तलांजली मिळून भाजप अधिक ताकदीने कामाला लागेल असे भाजपला वाटते आहे. एकंदरच भाजपला सोलापुरात उमेदवार निवडायला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे.