पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपची समाधान आवताडे यांना उमेदवारी, फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी भरणार अर्ज

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आवताडे यांनी फेसबुक पोस्ट करत पक्षाचे आभार मानले आहेत.

भाजपा पक्षश्रेष्ठींनी आमदार प्रशांत परिचारक व आवताडे यांच्यात मनोमिलन घडवून आणले आहे. यामुळे पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे आवताडे यांच्यात सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यानुसार भालकेंनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.  आवताडे यांनी दोन विधानसभा निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती. आता या निवडणुकीत परिचारक गट आवताडे यांच्या मागे उभा असल्याने निवडणुकीत भालके यांच्यासमोर कडवे आव्हान उभा राहणार आहे.

भालके, आवताडे मंगळवारी भरणार  उमेदवारी अर्ज
भगीरथ भालके आणि समाधान अवताडे दोघांचाही उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 30) भरला जाणार आहे.  भाजपाकडून आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक हे येणार आहेत. तर भालके यांचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे  यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.