‘राहुल गांधी नाही, राहुल लाहोरी’, भाजपची घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. विविध मुद्यावरून हल्लाबोल करत आहे. मात्र आता भाजपने पलटवार केला असून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने राहुल गांधी यांचा उल्लेख लाहोरी असा केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल, असं देखील पात्रा यांनी म्हटले आहे.

भारताने राहुल गांधी यांचं नाव बदललं आहे. ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा भाजपा व काँग्रेस असा विषय नाही. हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे ? भारत कोट्यावधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदानं जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे असं म्हणता. याच वेगाने काम सुरु राहिलं, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल, असं पात्रा म्हणाले.

संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच #RahulLahori हा हॅशटॅग देखील वापरला आहे. एका हिंदी वेबसाईटने त्याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट करुन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती हातळल्याचं म्हटलं होतं. भाजपा सरकारची आणखी एक जबरदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती हातळली आहे, असे ट्विट राहुल यांनी केलं होते. तसेच राहुल यांनी आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देखील दिला होता. त्यानंतर भाजपने निशाणा साधला आहे.