‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….’

कोलकाता : वृत्तसंस्था – भाजपा(BJP) आता भंगार पक्ष बनला आहे. तो दुसऱ्या पक्षातील बेकार लोकांना आपल्या पक्षात घेत आहे. ज्यादिवशी भाजपा निवडणुकीत पराभूत होईल, त्यादिवशी भाजपाचे समर्थक ट्रम्पच्या पाठीराख्यांप्रमाणे वर्तन करून दंगा करतील, अशी टीका करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सध्या पश्चिम बंगालमधील वातावरण तापलेले आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि बंगालची सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक असलेला भाजपा यांच्यात सध्या मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जवळ आल्यापासून तृणमूल काँग्रेसचे अनेक मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

तृणमूलमधून भाजपामध्ये होणाऱ्या पक्षांतराबाबत प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अनेक लोक केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने भाजपामध्ये जात आहेत. अनेक लोकांनी पैसे कमावले होते. आता त्यांना भाजपा घाबरवून, धमकाबून आपल्याकडे खेचत आहे. भाजपा आता भंगार पक्ष बनला आहे. तो दुसऱ्या पक्षातील बेकार लोकांना आपल्या पक्षात घेत आहे. तसेच भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी सर्वांना नोकऱ्या देऊ, सर्वांना नागरिकत्व देऊ असे सांगतात. मात्र निवडणुकीनंतर डुगडुगी वाजवून पसार होतात. मी बंगालमध्ये एनसीआर लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू आहे. तसेच तृणमूलचे अनेक नेतेही पक्षाचा राजीनामा देत आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममता सरकारमधील मंत्री लक्ष्मीरत्न शुक्ला यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.