माजी अर्थमंत्री ‘अरुण जेटली’ यांचे दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब होती. तब्येत अचानक खालावल्याने आणि श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली. वयाच्या ६६ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत कमजोर असल्याने त्यांच्यावर परदेशात देखील उपचार करण्यात आले होते. मागील वर्षीच परदेशात त्यांचे किडनी ट्रांसप्लंटचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर उपचार पूर्ण करुन ते पुन्हा भारतात दाखल झाले होते. त्यानंतर आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी निवडणूकही न लढवता राजकारणापासून ते लांब राहिले होते. तब्येत बऱ्यापैकी स्थिर असताना त्यांना पुन्हा एकदा त्रास होण्यास सुरुवात झाली. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही त्यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रधानमंत्री मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक मोठे नेते त्यांना भेटण्यासाठी आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. अखेर आज अरुण जेटली यांची प्राणज्योत मालवली.