मोदी सरकारनं भ्रष्टाचारप्रकरणी घ्यायला लावली जबरदस्तीनं ‘निवृत्ती’, BJP नेत्या शाजिया इल्मिनं दिलं त्यांनाच भाजपाचं ‘सदस्यत्व’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने अनेकदा भ्रष्टाचार मुक्त देश अशी गर्जना करत निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने तसे प्रयत्न करत असल्याचे दाखवलेही. मात्र भ्रष्टाचारामुळे नोकरी गमावयला लागलेल्या अधिकाऱ्याला पक्षाने प्रवेश दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

भ्रष्टाचारामध्ये सापडल्याने 39 अभियंत्याला आपल्या नोकरीतून निवृत्ती घ्यावी लागली होती त्यातील शराफत अली या अभियंत्याला दिल्ली भाजपने पक्षात घेतले आहे. शराफत यांच्यासह जवळ जवळ 35 हुन अधिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे देखील सहभागी होणार होते मात्र ऐन वेळी ते गैरहजर राहिले.

शराफत एई सिव्हील पदावर कार्यरत होते. त्यांना शाजिया इल्मि यांनी भाजपमध्ये घेतलं. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने नोकरीतून निवृत्ती घेतलेल्या लोकांना पक्षात स्थान का देण्यात आले याबाबत मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी मौन बाळगलेले पहायला मिळाले.

यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याचे मत आपचे नेते सुरजीत पवार यांनी व्यक्त केले आहे. यावर ते म्हणाले भाजप भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. अशा भ्रष्ट लोकांना भाजपने सदस्यत्व देणे यापेक्षा वाईट दुसरे काही असूच शकत नाही.

Visit :  Policenama.com