विधानसभेतच भाजप-शिवसेना ‘या’ आमदारांमध्ये ‘जुपंली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुकी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे नेते संजय गायकवाड आणि भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यात विधासभेतच जुंपली. संजय आणि अभिमन्यू यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच (दि 17 डिसेंबर) हा प्रकार घडला आहे.

आज सकाळी विधानसभेत जेव्हा कामकाज सुरू झालं यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रस्ताव मांडला. 25 हजारांची मदत अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना करायची आहे ती करण्यासाठीच त्यांनी मागणी केली. अशातच विरोधकांकडून बॅनरही फडकवण्यात आले. हे बॅनर खाली खेचण्यासाठी शिवसेनेचे आमदार पुढे सरसावले. यात बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हातातला बॅनर खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोन्ही आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. बघता बघता दोन्ही पक्षाचे आमदार आमने-सामने आले. दरम्यान दोन्ही पक्षात जवळपास हाणामारी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

यानंतर ज्येष्ठ आमदार धावून आले आणि त्यांनी मध्यस्थी केली. दोन्ही पक्षांच्या आमदारांना बाजूला करण्यात आलं. दोन्ही पक्षांच्या आमदारात एक संताप पहायला मिळाला. यानंतर विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. बॅनर फडकवले तर आता कारवाई करू असंही विधानसभा अध्यक्ष म्हणाले होते. तरीदेखील बॅनर फडकवण्यात आले. दरम्यान या आमदारांची नोंद झाली असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/