मनोहर जोशींच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही लहान सहान गोष्टीमुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोन्ही पक्ष आता वेगळे झाले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही, ते एकत्र येवू शकतात, असे मनोहर जोशी यांनी म्हटले होते. मात्र आता शिवसेनेने हात झटकले असून हे मत शिवसेनेचं नसून मनोहर जोशी यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रीया शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

विधानसभा निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर ही कटुता वाढलीय. तीस वर्षाची साथ सोडून शिवसेनेने जन्मापासून विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. एवढच नाही तर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी भाजप विरोधी सर्व पक्ष एकत्र आले. त्यामुळे भाजपला सर्वाधीक जागा मिळून देखील सत्तेपासून दूर रहावे लागले. अशातच मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, मनोहर जोशी यांच्या पीढीतल्या लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलंय. भाजपनं गेल्या काही वर्षातल वर्तन बघितलं तर ते आपल्या मित्रांना संपवणं असंच आहे. त्यामुळे शिवसेनेने वेगळी वाट निवडली. जोशी यांचे मत हे शिवसेनेचे नसून त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com